वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीचे सुलभीकरण शक्य – माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर

पुणे – राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीच्या पध्दतीत सुलभीकरण करणे शक्य आहे. एकाच वेळेस वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी ठराविक मुदतीत दिल्यास अडचणीच दूर होतील, असे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती केल्यानंतर संस्थेने केलेली नियुक्ती नियमानुसार केलेली आहे किंवा नाही हे तपासून वैयक्तिक मान्यता दिली जाते. प्राथमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता
माध्यमिक शिक्षणाधिकारी देतात तर उच्च माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता विभागीय शिक्षण उपसंचालक देतात. पूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी कार्यालयीन तपासणीच्या वेळी दहा टक्के वैयक्तिक मान्यतांची प्रकरणे तपासणी करायचे त्यामुळे कार्यालयास एक प्रकारची शिस्त होती वरिष्ठ कार्यालयाच्या तपासणीमध्ये त्रुटी येऊ नये म्हणून वैयक्तिक मान्यता देताना खूप दक्षता व काळजी घेतली जात होती.
वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यतेचा आदेश न देता वैयक्तिक मान्यतेची संचिका दर आठ दिवसांनी सध्या शालार्थ आयडी देण्याचे अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांकडे पाठवायच्या. त्यांनी दिलेली मान्यता योग्य आहे किंवा नाही हे तपासून पंधरा दिवसात वैयक्तिक मान्यता देणारे अधिकाऱ्यांना कळवायचे. दिलेली वैयक्तिक मान्यता नियमानुसार असेल तर शालार्थ आयडी द्यायचा. त्रुटी असेल तर त्रुटी बाबत कळवायचे. त्यांनी शालार्थ आयडी दिल्यानंतर ज्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिलेलली आहे त्यांना वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी एकाच वेळेस द्यायचा. एकदा वैयक्तिक मान्यतेसाठी व शालार्थ आयडीसाठी अशी दोन वेळा संचिका सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे मतही टेमकर यांनी व्यक्त केले आहे.
वैयक्तिक मान्यता देणारे अधिकारी व शालार्थ आयडी देणारे अधिकारी अशा दोघांची समिती स्थापन करावयाची. वैयक्तिक मान्यतासाठी आलेली संचिका बाबत दोघांनी दर आठवड्यातील एका ठराविक दिवशी एकत्रित बसून वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्याबाबत एकदाच निर्णय घ्यायचा. तो निर्णय संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कळवायचा. ही पध्दतही अवलंबता येणार असल्याचा पर्याय टेमकर यांनी सुचविला आहे.

