नवी दिल्ली – विविध देशातील युद्धामुळे भूराजकीय तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या जागतिक व्यापार युद्धाची तीव्रता आणखी वाढविली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. शुक्रवारी चांदीचा दर पुन्हा 1,900 रुपयांनी वाढून 1 लाख 41 हजार 900 रुपये या विक्रमी पातळीवर गेला आहे. दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 330 रुपयांनी वाढून 1 लाख 17 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. भारतात दसरा- दिवाळी या कालावधीत सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. दर उच्च पातळीवर असूनही या काळात भारतीय ग्राहक प्रतिकात्मकरित्या तरी सोने आणि चांदीची खरेदी करण्याची शक्यता असल्यामुळे भारतातील दागिने उत्पादक सोने खरेदी करीत असल्यामुळे सोन्याच्या दरात जास्तच वाढ होत असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. जागतिक बाजारात काही प्रमाणात नफेखोरी झाल्यामुळे सोन्याचा दर 0.12 टक्क्यांनी कमी होऊन 3,744 डॉलर आणि चांदीचा दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 45.03 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. मात्र देशातील आणि परदेशातील वायदे बाजारात या दोन धातूचे दर वाढत आहेत. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात या दोन धातूचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये दक्षिण आशियाई देशातून मोठ्या प्रमाणात चांदीच्या दागिन्याची आयात होत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. आयात रोखण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने परवा चांदीच्या दागिन्याच्या आयातीला मर्यादा आणल्या आहेत. चांदीच्या दागिन्याची आयात वाढल्यामुळे भारतातील चांदीच्या दागिने उद्योगावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे पाहून केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्याच्या आयातीवर मर्यादा आणल्या आहेत. मात्र तयार चांदीची आयात रोखण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत शुक्रवारीही चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. फक्त गुंतवणुकीसाठी खरेदी – सोने आणि चांदीचे दर इतक्या उच्च पातळीवर आहेत की, गरीब आणि मध्यमवर्गीयांना दागिन्यासाठी या दोन धातूची खरेदी करणे अवघड झाले आहे. मात्र तरीही देशात या दोन धातूची खरेदी वाढत आहे. ही खरेदी जास्त प्रमाणात गुंतवणुकीसाठी केली जात असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. रिझर्व बँकाच सोने खरेदी करीत असल्यामुळे नजीकच्या काळात सोन्यावर परतावा जास्त मिळण्याची शक्यता आहे.