Gold-Silver Price Crash: जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतीत सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत ज्या वेगाने चांदीचे दर गगनाला भिडले होते, त्याहून अधिक वेगाने ते आता जमिनीवर आले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत चांदीला ३ लाखांवरून ४ लाखांचा टप्पा गाठण्यासाठी १० दिवस लागले होते, मात्र उच्चांकी स्तरावरून ती सुमारे २ लाख रुपयांनी (१,९४,२४३ रुपये) खाली येण्यासाठी केवळ ४ दिवस लागले. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीने ५० डॉलरची घसरण नोंदवली असून सोन्याच्या दरातही २४ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. किमतीत सातत्याने घसरण – देशांतर्गत बाजारपेठेत (MCX) चांदीच्या मार्च कराराने २९ जानेवारी रोजी ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर किमतीत सातत्याने घसरण होत असून आज चांदीने २,२५,८०५ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला. अशा प्रकारे अवघ्या काही दिवसांत चांदीचे भाव ४६.२४ टक्क्यांनी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हीच स्थिती असून कॉमेक्सवर चांदी १२१.७९ डॉलरवरून ७१.२० डॉलरपर्यंत खाली आली होती. ही मोठी पडझड असली तरी सत्राच्या उत्तरार्धात किमतीत काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. Gold price today। सोन्यातही घसरण – सोन्याच्या बाबतीतही गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,८०,७७९ रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर गेला होता, तो आता ४४ हजार रुपयांच्या घसरणीसह १,३७,०६५ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याने ५,५८६ डॉलरचा उच्चांक गाठला होता, मात्र आता ते सुमारे १,२०० डॉलरने स्वस्त होऊन ४,४०० डॉलरच्या आसपास व्यापार करत आहे. या ऐतिहासिक घसरणीवर भाष्य करताना बाजार तज्ज्ञांनी सांगितले की, उच्च स्तरावर झालेली नफावसुली आणि जागतिक स्तरावरील आर्थिक बदल ही यामागील मुख्य कारणे आहेत. केविन वॉर्श यांची फेड रिझर्व्हच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता असल्याने डॉलर अधिक मजबूत होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर झाला आहे. याशिवाय चिनी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री ही देखील घसरणीला कारणीभूत ठरली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असून, पुरवठ्यातील तूट आणि जागतिक अनिश्चितता पाहता दीर्घकाळात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचा – Share Market: बजेटच्या धक्क्यातून सावरला बाजार; सेन्सेक्स 944 अंकांनी वधारला, निफ्टी 25,100 च्या जवळ एमसीएक्स काय आहे? (Multi Commodity Exchange – MCX) एमसीएक्स हे भारतातील सर्वात मोठे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे, जे मुंबईत स्थित आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जसे शेअर बाजारात कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री होते, तसेच एमसीएक्सवर सोने, चांदी, तांबे, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांसारख्या मौल्यवान धातू आणि ऊर्जा संसाधनांचे व्यवहार केले जातात. भारतीय बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दर ठरवण्यात या एक्सचेंजची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे एक्सचेंज ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते, जिथे व्यापारी आणि गुंतवणूकदार भविष्यातील किमतींचा अंदाज घेऊन सौदे (Futures and Options) करतात. भारतातील सराफ आणि ज्वेलर्स इथल्या किमतींचा आधार घेऊनच आपले दैनंदिन दर निश्चित करत असतात. हे पूर्णपणे भारतीय नियमांनुसार आणि ‘सेबी’च्या (SEBI) देखरेखीखाली चालते. कॉमेक्स (Commodity Exchange – COMEX) कॉमेक्स हे अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेले जगातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे फ्युचर्स एक्सचेंज आहे, जे ‘शिकागो मर्कंटाइल एक्सचेंज’ (CME Group) चा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीच्या किमती ठरवण्याचे हे मुख्य केंद्र मानले जाते. जगभरातील मोठ्या बँका, खाण कंपन्या आणि संस्थात्मक गुंतवणूकदार कॉमेक्सवर व्यवहार करतात. इथे होणाऱ्या किमतींमधील बदलांचा थेट परिणाम भारतासह जगातील सर्व देशांच्या बाजारपेठांवर होतो. जेव्हा आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले, तेव्हा त्याचा संदर्भ प्रामुख्याने कॉमेक्सवरील व्यवहारांशी असतो. हे एक्सचेंज जगासाठी एक ‘प्राइस डिस्कवरी’ यंत्रणा म्हणून काम करते, म्हणजेच सोन्या-चांदीचे जागतिक मूल्य किती असावे हे इथल्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते.