नवी दिल्ली – अमेरिकेच्या फेडरल रिझवनेे काल व्याजदरात पाव टक्के कपात केल्यानंतर सोने आणि चांदीचे दर नव्या उच्चांकी पातळीवर जात आहेत. जागतिक बाजारात या दोन धातूचा दर वाढत आहे. त्याचबरोबर रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताला या दोन धातूची आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत भारतामध्ये या दोन धातूचे दर आणखी वाढत आहेत. दिल्ली सराफात चांदीचा दर शुक्रवारी 5,100 रुपयांनी वाढून 1 लाख 99 हजार 500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. चांदीच्या दराचा हा नवा विक्रम आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढत आहे. असे असतानाच महागाईपासून सामना करण्यासाठी चांदीची खरेदी वाढत असल्यामुळे या धातूचे दरात वाढ होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. सध्या चांदीचा दर विक्रमी पातळीवर आहे. तर सोन्याचा दर विक्रमी पातळीकडे वेगाने आगेकूच करीत असल्याचे एसडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 110 रुपयांनी वाढून 1 लाख 33 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. रुपयाच्या अवमूल्यनामुळेही सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारात याच कारणामुळे सोन्याचा दर 58 डॉलरने म्हणजे 1.37% वाढून 4,338 डॉलर आणि चांदीचा दर एक टक्क्याने वाढून 64.57 डॉलर प्रति औंसावर गेला. कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे चलन आणि कमॉडिटीज विभागाचे प्रमुख अनिंद्य बॅनर्जी यांनी सांगितले की, अगोदरच जागतिक पातळीवर महागाई जास्त असताना अमेरिकेने व्याजदर कपात केल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. त्याचबरोबर आशियाई देश डिजिटल चांदीपेक्षा प्रत्यक्ष चांदीची मागणी करत असताना चांदी उत्पादक देशांना ही मागणी पूर्ण करता येणे शक्य नसल्यामुळे चांदीच्या दारात जास्त वाढ होत आहे