पुणे जिल्हा | कोलकात्ता अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

बारामती, (प्रतिनिधी)- कोलकात्ता येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षित महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापकांनी निषेध मूक मोर्चा काढला.
मोर्चामध्ये महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, पत्रकारिता विभाग, विद्यार्थी विकास मंडळाचे असे एकूण ५५० विद्यार्थी विद्यार्थिनी, सहभागी झाले होते.
या प्रकरणाची दखल घेऊन यामध्ये सामील अपराध्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारच्या दुर्दैवी व अमानूष घटना समाजात यापुढे घडणार नाहीत, अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्र यांना उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर यांनी दिले.
मोर्चामध्ये आयएमए, बारामतीच्या अध्यक्ष डॉ. साधना कोल्हटकर, कोलकात्ता येथील प्रिया दत्ता, डॉ. महेश काटे, डॉ. अपर्णा काटे, डॉ. हरिदास काटे, उज्ज्वला जाधव, प्रशासकीय अधिकारी, महिला बालकल्याण समिती हे देखील सहभागी होते.
मूक मोर्चास अनेकांन्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी पाठिंबा दिला. मूक मोर्चाचे संयोजन महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या प्रमुख डॉ. सीमा नाईक गोसावी, समितीतील सर्व सदस्य यांनी केले.





