सिक्कीम बनले पूर्णपणे ‘विरोधक मुक्त’ राज्य; एकमेव आमदार सत्ताधारी पक्षात सामील

Sikkim | सिक्कीममध्ये विरोधी पक्षाचा एकच आमदार होता. मात्र सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे एकमेव आमदार तेनसिंग नोरबू लामथा यांनी बुधवारी सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चात सामील झाले आहे. त्यामुळे सिक्कीम हे एकमेव असे विरोधक मुक्त राज्य बनले आहे. सिक्कीम विधानसभेचे निकाल 2 जून रोजी जाहीर झाले. एसकेएमने निवडणुकीत 32 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या. एसडीएफकडून तेनझिंग नोरबू लामथा विजयी झाले होते. मात्र त्यांनीही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.
“मी माझ्या मतदारांचा सल्ला घेतला ज्यांनी मला एसकेएममध्ये सामील होण्यासाठी सुचवले. कारण गती सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तर मुख्यमंत्र्यांनी लामथा यांचे SKM कुटुंबात स्वागत केले, ते म्हणाले की, “आज 23-सियारी मतदारसंघाचे माननीय आमदार तेनसिंग नोरबू लामथा यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी मिंटोकगुंग येथे भेटून मला आनंद झाला. ते अधिकृतपणे आमच्या SKM कुटुंबात सामील झाले आहे,”असे सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
लमथा यांनी केला शिक्षण मंत्र्यांचा पराभव
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लमथा यांनी SKM नेत्या आणि शिक्षण मंत्री कुंगा नीमा लेपचा यांचा 1,314 मतांनी पराभव केला होता. 2 जून रोजी निकाल जाहीर झाल्यापासून ते SKM मध्ये सामील होणार असल्याची अटकळ होती, लामथा यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी बाजू बदलण्याचा इशारा दिला होता.
सिक्कीममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, परंतु केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये एसकेएमचा समावेश आहे. त्यानुसार आता सिक्कीममधील विरोधी पक्षाचा एकमेव नेता एनडीए आघाडीत सामील झाला आहे.
सिक्कीममध्ये विरोधी पक्षाकडे एकही आमदार नसण्याची 10 वर्षात ही दुसरी वेळ आहे. 2 जून रोजी जाहीर झालेल्या निकालात SKM ने 32 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी स्वत: रेनॉक आणि सोरेंग-चाकुंग या दोन विधानसभा जागांवर विजय मिळवला आहे. त्यांची पत्नी कृष्णा कुमारी राय यांनीही नामची-सिंघथांग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. सुमारे 11 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या त्यांच्या पक्षाने सिक्कीममध्ये सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा मार्ग पार केला आहे.
कोण आहेत तेनझिंग नोरबू लामथा ?
तेनझिंग नोरबू लामथा यांचा जन्म 1975 मध्ये झाला. 49 वर्षीय तेनझिंग यांनी दिल्ली पुसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचा डिप्लोमा केला आहे. 1992 मध्ये त्यांची सिक्कीमच्या रोड आणि ब्रिज विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती झाली.
तेनझिंग नोरबू लामथा यांनी 2018 मध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण झाल्याने राज्य सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. समाजसेवक म्हणून काम करण्यासोबतच त्यांनी सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये सामील होऊन सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये, SDF ने त्यांना श्यासी जागेवरून उमेदवारी दिली होती.
हेही वाचा:
“संसारातील मज्जा टिकवायला आणि…”; प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा मजेशीर व्हिडिओ





