दूध महागण्याची चिन्हे; जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई

पुणे – एकीकडे विविध अन्नधान्य, भाज्यांची महागाई वाढत असताना, येत्या काळात दूध महागण्याची चिन्हे आहेत. कमी पावसामुळे जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच चारा साठा प्रशासनाकडे आहे. त्यामुळे दूभत्या प्राण्यांना चारा पुरवायाचा कसा? हा प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहेत.
जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उपलब्ध चारा पुढील महिन्यापर्यंतच पुरेल, अशी परिस्थिती आहे. मागील रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रानुसार तसेच चालू खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रानुसार उपलब्ध होणारा चारा आणि चारा लागवडीचे क्षेत्र यामधून अंदाजे 74.73 लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण पशुधन हे 11 लाख 44 हजार 893 एवढे आहे. या पशुधनासाठी दररोज वाळलेला चारा हा 6 हजार 359 मेट्रिक टन एवढा तर हिरवा चारा दररोज 15 हजार 897 मेट्रिक टन एवढा लागतो. म्हणजेच हा उपलब्ध चारा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल, असे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गतवर्षी लम्पी आजाराने पशुधन व्यवसायाला फटका बसला. जिल्ह्यातील दुभती जनावरे यामध्ये गेली. आता यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी पशुपालक अडचणीत सापडणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. लहान जनावर तीन किलो वाळलेला चारा तर साडे सात किलो हिरवा चारा खातात.
तर मोठी जनावरे सहा किलो वाळलेला आणि पंधरा किलो हिरवा चारा दररोज खातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा कसा उपलब्ध करायाचा, असा प्रश्न आहे. तर, या स्थितीचा परिणाम दूध पुरवठ्यावर होण्याची चिन्हे आहेत.





