भारतात साखरेच्या उत्पादनात लक्षणीय घट; भाव वाढणार?

नवी दिल्ली – यावर्षी साखरेचे उत्पादन बर्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता आता गृहीत धरली जाऊ लागली आहे. मात्र भारताकडे वर्षभर पुरेल एवढा साखरेचा साठा उपलब्ध असल्यामुळे या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे साखर उत्पादकानी म्हटले आहे.
डिसेंबर पर्यंत भारताला जेवढी साखर पाहिजे तेवढी साखर सध्या साखर कारखान्याकडे आहे. साखर कारखान्यानी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार सध्या साखरेचा शिल्लक साठा 50 लाख टनापर्यंत आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज या संस्थेने ही माहिती दिली आहे. 15 मे पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार साखरेचे उत्पादन या वर्षी 18.38 टक्क्यांनी कमी होऊन 25.74 दशलक्ष टन इतके झाले आहे. गेल्या वर्षी कालावधीत 31.54 दशलक्षकांनी एवढ्या साखरेचे उत्पादन झाले होते.
गेल्या वर्षीच्या विषम पर्जन्यमानामुळे साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध झालेला नाही. साखरेचा उतारा गेल्या वर्षाच्या 10.10% वरून यावर्षी 9.30% इतका झाला आहे. त्यामुळे एकूण साखर उत्पादनावर नकारात्मक परिणाम झालेला आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 312 दशलक्ष टन उसाचे गाळप झाले होते. यावर्षी 276 दशलक्ष टन उसाचे गाळप झाले आहे.
या पार्श्वभूमीवर या पूर्ण हंगामामध्ये साखरेचे उत्पादन 26.11 दशलक्ष टन इतके मर्यादित होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पूर्ण हंगामामध्ये 31.9 दशलक्षक टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षाची साखर आणि या वर्षाची साखर मिळून डिसेंबरपर्यंत साखर कारखान्याकडे 50 लाख टन एवढी साखर शिल्लक राहणार आहे. यामुळे साखरेच्या उपलब्धतेवर फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही. आता देशभरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षी साखरेचे उत्पादन पुरेसे होईल असे सांगण्यात येते.
महाराष्ट्रात साखर उत्पादन वाढणार
यावर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटक या साखर उत्पादन करणार्या मोठ्या राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत साखर उत्पादन वाढू शकते असे या संघटनेने म्हटले आहे. केंद्र सरकारने मर्यादित साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत सध्या साखरेचे दर 3,880 ते 3,920 रुपये प्रति टन या पातळीवर आहे. साखरेचे दर वाढून मिळावे यासाठी प्रयत्न चालू असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.





