किल्ले तोरणा गडावर बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

विंझर : वेल्हे ( राजगड ) तालुक्यामध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास तोरणा गडाच्या परिसरामध्ये बिबट्या आढळून आल्याने पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी तोरणा गडावर आलेल्या पर्यटक व नागरिकांनी मोबाईलमध्ये बिबट्याच्या दृश्याचे चित्रीकरण केले आहे.
गेले तीन दिवस बिबट्याचे वास्तव्य तोरणा गडाच्या परिसरमध्ये असल्याने अनेक पर्यटकांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाकडे स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे. किल्ले तोरणा गडाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून मेट पिलावरे मार्गे हजारो पर्यटक गडावर जात असतात.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी , डोंगर व गवताचे रान असल्याने रस्त्यावर गडाच्या शेजारी वनविभागाच्या हद्दीमद्ये यापूर्वीसुद्धा बिबट्याचे लहान पिल्लू दिसून आले होते. त्यानंतर शुक्रवारी तोरणा गडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानंतर तोरणा गडाच्या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला.





