पुणे जिल्हा | दोन गावांतील शिव रस्त्याची चाळण

मलठण, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डीमधील जोतिबानगर येथील भीमा नदीकडे जाणारा रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा रस्ता हिंगणीबेर्डी व मलठण शिव रस्ता असून या मार्गावर बरीच वर्दळ असल्याने प्रशासनाकडून दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मौजे हिंगणीबेर्डी व मलठण या दोन महसुली गावांच्या शिवेवरून हा रस्ता असल्याने दोन्ही बाजूने सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रावरील शेतीसाठी या मार्गाचा वापर केला जातो. जोतिबानगर परिसरात राहणारे लोकांना तसेच वस्त्यांवरील नागरिकांना या मार्गावर जास्त दळणवळणासाठी वर्दळ असते.
परंतु पावसाळ्यामध्ये रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने भरपूर प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे शेतात कामधंद्यासाठी जाणारे शेतमजूर, शेतकरी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
परिसरातील शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला, कांदा अन्य शेतीमाल पावसाळ्यात बाजारपेठेत नेण्यासाठी ज्योतिबानगर येथे डांबरी रस्त्यापर्यंत ट्रॅक्टरद्वारे मालवाहतूक करावी लागत आहे.
त्यानंतर इतर ट्रान्सपोर्टने इतर मार्केटसाठी पाठवावा लागत आहे. जनावरांचा चारा वाहून नेताना शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी दोन्ही गावच्या शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.
हिंगणीबेर्डी मलठण शिव रस्त्यासाठी अद्याप जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र शासनातर्फे अजून कुठल्याच प्रकारचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी पडलेला नाही. हा मार्ग भीमा नदीपर्यंत जातो आणि त्यामुळे परिसरातील तीन चार गावातून शेतकऱ्यांच्या पाईपलाईन् येथून गेल्या आहेत.
तसेच दोन्ही गावच्या शेत जमिनीमधील ऊस वाहतूकी साठी हाच मुख्य रस्ता आहे.एकूणच परिसरातील मुख्य दळणवळणासाठी वापरात असणाऱ्या या रस्त्याची खूप दुरावस्था झाली आहे. – भाऊसाहेब नामदेव कामठे, माजी चेअरमन, विकास सोसायटी, हिंगणीबेर्डी.





