भारतीय उपखंडाला चीनकडून वेढा; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

मुंबई – चीनकडून होणारी घुसखोरी ही चिंतेची बाब असून भारतीय उपखंडाला सर्व दिशांनी वेढा देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. यावेळी नेपाळ आणि श्रीलंकेमधील हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी देशाच्या माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली. यावेळी माजी हवाई दल प्रमुख भूषण गोखले आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले उपस्थित होते.
या बैठकीत विजय गोखले यांनी भारत-चीन संबंधांचा इतिहास सांगितला. खासकरुन त्यांनी सीमारेषेवरुन झालेल्या वादांची माहिती दिली. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यात नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावावर त्यांची मतं मांडली, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, चिनी सैन्यांकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. लडाखमधील पॅंगॉंग सरोवर परिसरात चिनी सैन्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला.





