Sunil Malhotra Dies: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक; वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन, भावूक पोस्टद्वारे दिली माहिती
Sunil Malhotra Dies: खुद्द सिद्धार्थने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही हृदयद्रावक बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Sunil Malhotra Dies: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन झाले असून, खुद्द सिद्धार्थने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही हृदयद्रावक बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘शिस्त आणि मूल्यांचे मूर्तिमंत उदाहरण’ –
सिद्धार्थने मंगळवारी रात्री इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली. वडिलांसोबतचे काही जुने फोटो शेअर करत त्याने त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. सिद्धार्थने लिहिले की, “माझे वडील अत्यंत प्रामाणिक, सत्यवादी आणि सुसंस्कृत व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यभर आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. कठोरता न दाखवता आम्हाला शिस्त कशी लावायची आणि अहंकार न बाळगता शक्तीचा वापर कसा करायचा, हे त्यांनी आम्हाला शिकवले.”
आजारपणातही कायम राखली सकारात्मकता –
सुनील मल्होत्रा यांनी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून आपली जबाबदारी चोख बजावली होती. सिद्धार्थने पोस्टमध्ये नमूद केले की, “आयुष्याने त्यांची अनेकदा परीक्षा घेतली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. गंभीर आजार आणि त्यानंतर आलेल्या स्ट्रोकमुळे त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला, तरीही त्यांनी आपली सकारात्मकता आणि जिद्द सोडली नाही. शेवटपर्यंत त्यांचा आत्मविश्वास बुलंद होता.”
सिनेसृष्टीतून शोक व्यक्त –
सिद्धार्थच्या या पोस्टनंतर बॉलिवूडमधील कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट्सद्वारे सुनील मल्होत्रा यांना श्रद्धांजली वाहिली असून मल्होत्रा कुटुंबाचे सांत्वन केले आहे. सिद्धार्थचे आपल्या वडिलांशी अत्यंत जवळचे नाते होते आणि अनेकदा मुलाखतींमध्ये तो आपल्या यशाचे श्रेय वडिलांच्या संस्कारांना देत असे.






