‘तुम्ही केवळ मोहरे चालवत होते आणि मी नाती सांभाळत बसलो’, माजी मंत्र्याच्या राजीनाम्याने RJDला मोठा झटका

पाटणा – लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या बिहारमधील राष्ट्रीय जनता दल या पक्षाला मोठा हादरा बसला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव शाम रजक यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मला बुध्दीबळ खेळाची आवड होती मात्र मी त्यात फसलो. तुम्ही केवळ मोहरे चालवत होते आणि मी नाती सांभाळत बसलो असे रजक यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
शाम रजक हे बिहारचे माजी मंत्री असून अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते लालू यादव यांच्या कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीत राजद चांगली कामगिरी करू शकला नाही आणि आता पुढच्या वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.
त्यातच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य या नव्या पक्षाने सर्वच प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले असल्यामुळे लालू यांच्या पक्षाला जुने सहकारी सांभाळून ठेवण्याची गरज असताना रजक यांचा राजीनामा त्यांना हादरा देणारा आहे.





