IND vs ENG : शुबमन गिलचे ऐतिहासिक द्विशतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार

Shubman Gill 1st Double Century in Test : भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले आहे. या द्विशतकी खेळीच्या जोरावर गिलने एक खास इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर गिलने ३११ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. हे गिलचे कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक आहे. त्याने २१ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. या मालिकेपूर्वीच गिल याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याने पहिल्या सामन्यातही शतक ठोकले होते.
इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकणारा पहिला आशियाई कर्णधार –
शुबमन गिल हा इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक ठोकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही आशियाई कर्णधाराला इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक ठोकता आले नव्हते. यापूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय कर्णधाराची सर्वोच्च खेळी मोहम्मद अझरुद्दीन याच्या नावावर होती. त्याने १९९० मध्ये मँचेस्टर कसोटीत १७९ धावा केल्या होत्या. तर आशियाई कर्णधाराचा विक्रम श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान याच्या नावावर होता, ज्याने २०११ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर १९१ धावा केल्या होत्या.
इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा ठरला तिसरा भारतीय –
Maiden DOUBLE-CENTURY for Shubman Gill in Test Cricket! 💯💯
What a knock from the #TeamIndia Captain! 🫡🫡
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/JLxhmh0Xcs
— BCCI (@BCCI) July 3, 2025
इंग्लंडमध्ये शुबमन गिलपूर्वी केवळ दोन भारतीय फलंदाजांनी द्विशतक झळकावले होते. १९७९ मध्ये सुनील गावस्कर यांनी २२१ धावांची खेळी केली होती. राहुल द्रविडने २००२ मध्ये ओव्हलच्या मैदानावर २१७ धावांची दमदार खेळी साकारली होती. आता शुबमन गिल या यादीत तिसरे फलंदाज म्हणून सामील झाले आहेत. सचिन तेंडुलकर यांचा इंग्लंडमधील सर्वोच्च धावसंख्या १९३ धावा आहे, जो त्यांनी २००२ मध्ये केला होता.
हेही वाचा – IND vs ENG : रवींद्र जडेजाने केला ‘वर्ल्डरेकॉर्ड’! WTC मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
गिलने गावस्करांच्या विक्रमाची केली बरोबरी –
कर्णधार म्हणून नियुक्त झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या डावात शुबमन गिलने द्विशतक झळकावले आहे. कर्णधार नियुक्त झाल्यानंतर सर्वात कमी डावात द्विशतक ठोकणारा भारतीय खेळाडू हा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर होता. त्यांनीही कर्णधार नियुक्त झाल्यानंतर तिसऱ्या डावात द्विशतक झळकावले होते. आता गिलने त्यांच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने १२९ षटकानंतर ६ बाद ५१० धावा केल्या आहेत. कर्णधार गिल २३१ आणि वॉशिंग्टन सुंदर २४ धावांवर खेळत आहे. त्यामुळे भारतीय संघ खूपच मजबूत स्थितीत आहे.





