Mirzapur The Film Announced: ओटीटी विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेली वेबसिरीज म्हणजे मिर्जापूर. या वेबसिरीजने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. आत्तापर्यंत जेवढे काही सीझन या वेबसिरीजचे रिलीज झाले आहेत, त्या सर्वच सीझनवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. सिरीजमधील कथा प्रेक्षकांना भुरळ पाडणारी होती. याशिवाय वेबसिरीजमधील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडले. वेबसिरीजमध्ये स्त्री कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना त्यांची दखल घ्यायला लावली. आता मिर्जापूरच्या टीमने चित्रपटाची घोषणा केली आहे. या सगळ्यात या सिरीजमधील पहिल्या सीझनमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या वेबसिरीजमध्ये श्रियाने स्वीटी गुप्ता हे पात्र साकारले होते. तिने गुड्डू भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मिर्झापूरच्या शेवटच्या सिझनमध्ये स्वीटीचा मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात आले. आता तब्बल ८ वर्षानंतर स्वीटी गुप्ता परत येणार असल्याचे संकेत या पोस्टमधून मिळत आहे. श्रिया पिळगावकरने पोस्टमधून दिलेल्या संकेतमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री श्रिया पिळगावकरने सोशल मीडियावरून मिर्झापूर टीमसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सेटवरचा आहे. “8 वर्षांनंतर… मृत्यूनंतर कोण परत आलं आहे, ओळखा पाहू.. मिर्झापूर – द फिल्म. शूटिंग सुरू. लवकरच भेटू”. असे कॅप्शन फोटोच्या खाली श्रियाने दिले आहे. “गोंधळ करू नका, हा एक चित्रपट आहे. पार्ट 4 नाही”, असेही तिने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वीटी गुप्ता या चित्रपटातून कशा स्वरूपात परतणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हेही वाचा : अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ सिनेमाचा ६ वर्षांनी येणार सीक्वल? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण