Pune | श्रीराम-सीता विवाह सोहळा थाटात

पुणे : फुलांनी सजलेले पेशवेकालीन श्रीराम मंदिर… पारंपरिक वस्तूंनी सजलेले रुखवत… सनई चौघड्याचे मंगलमय सूर आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात प्रभू श्रीराम आणि सीता माई यांचा पवित्र आणि ऐतिहासिक विवाह सोहळा पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवला. महाराष्ट्रात प्रथमच अशा विवाह सोहळ्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले.
श्री रामजी संस्थान, तुळशीबाग यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात करण्यात आले होते. कुडलि शृंगेरी महासंस्थान मठाचे शंकराचार्य श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
विवाह सोहळ्यातील पारंपरिक विधींसह हळद, कन्यादान, सप्तपदी आणि मधुपर्क यांसारख्या विधींनी सोहळा साजरा करण्यात आला. मंगलाष्टकांच्या स्वरात देवतांच्या मूर्तींवर अक्षता टाकून हा विवाह सोहळा पार पडला.





