Dr. Shrikant Shinde : एनडीएने खा.श्रीकांत शिंदेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. या निमित्ताने एनडीएतील भाजपचा मित्र पक्ष या नात्याने शिवसेनेचे खासदार डॉ. शिंदे यांच्यावर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
मंगळवारी ९ सप्टेंबरला संसदेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या सी.पी. राधाकृष्णन यांना यापूर्वीच शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नवी दिल्ली शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. या बैठकीत मतदान कसे करायचे, मतदानाची प्रक्रिया खासदारांना समजावून सांगण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. खासदार डॉ. शिंदे यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि मंत्री राम मोहन नायडू हे एनडीए उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहेत.





