Pune Gramin : वार्षिक क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप जिंकून श्री विघ्नहर विद्यालय ओझरने मिळवले घवघवीत यश

ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेत श्री विघ्नहर विद्यालय ओझरच्या एकूण ६ संघांनी प्रथम क्रमांक मिळवित व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप प्राप्त केली असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर दांगट सर यांनी सांगितले.
दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०२४ राेजी वाघीरे महाविद्यालय सासवड येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले होते. संस्थेच्या साठ शाखांमधून खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यालयाचे ७२ स्पर्धक सहभागी झाले. यामधील १४, १७, १९ वर्षे मुले व मुली अशा एकूण ६ संघांनी सहभाग घेतला होता.झालेल्या आटीतटीच्या सामन्यांमध्ये सर्व गटांच्या मुला-मुलींमधून श्री विघ्नहर विद्यालय ओझरच्या व्हॉलीबॉलच्या सर्व संघांनी प्रथम क्रमांक मिळवित संस्थेची चॅम्पियनशिप मिळविली आहे.
या सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्रक, मेडल व सन्मान चिन्ह देऊन गौरविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक गणेश राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संतोष सगर, अनिल भोजने, उज्वला खाडे, हेमलता यादव यांचे सहकार्य लाभले. सर्व खेळाडू व मार्गदर्शक यांचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, ओझर नंबर एक व दोनच्या सरपंच अनुक्रमे राजश्री कवडे व तारामती कर्डक व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





