ओझर येथे श्री विघ्नहर गणपती जन्मोत्सव सोहळा २४ ते २८ ऑगस्टदरम्यान

ओझर : अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र ओझर येथे महान साधू मोरया गोसावी यांच्या सांप्रदायानुसार भाद्रपद महिन्यात येणारा श्री विघ्नहर गणपती जन्मोत्सव सोहळा २४ ते २८ ऑगस्ट या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासंदर्भात श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी माहिती दिली.
द्वारयात्रा आणि पालखी सोहळा:
या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्री गणेश भगवान आपल्या बहिणींना आमंत्रित करण्यासाठी जात असतात, या परंपरेनुसार आयोजित होणाऱ्या पालखी सोहळ्यास ‘द्वारयात्रा’ असे संबोधले जाते. पहिला द्वार २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत उंब्रज येथे लक्ष्मी-नारायण पूजेने साजरा होईल. दुसरा द्वार २५ ऑगस्ट रोजी धनगरवाडी (धनेगाव) येथे उमा-महेश पूजेने, तिसरा द्वार २६ ऑगस्ट रोजी शिरोली खुर्द येथे रती-कंदर्प पूजेने, तर चौथा द्वार २७ ऑगस्ट रोजी आंबेराई, ओझर (जगदाळे मळा) येथे सूर्य-पूजेने संपन्न होणार आहे.
कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम:
दरम्यान, सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० या वेळेत मंदिरात ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन होईल. पालखीच्या आगमनानंतर दुपारी १२:३० ते १ या वेळेत मोरया गोसावी यांची पदे म्हणत श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाईल. याच दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत सामूहिक शेरण्या आणि दंडवते होतील. रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. मयूर महाराज बोडके यांचे कीर्तन, तर मध्यरात्री १२ नंतर छबिना भजन आणि जागराचा कार्यक्रम आयोजित आहे. २८ ऑगस्ट रोजी पालखी मिरवणुकीचा सांगता सोहळा होईल.
कुस्त्यांचा आखाडा आणि मनोरंजन कार्यक्रम:
२८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत लाल मातीवरील भव्य कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.
भाविकांना आवाहन:
श्री विघ्नहर गणपती जन्मोत्सव सोहळा आणि इतर सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विघ्नहर गणपती ट्रस्ट आणि समस्त ओझर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.





