वडगाव मावळ, – वडगाव मावळ शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री पोटोबा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जन्मोत्सव सोहळ्यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी आठवडाभर सुरु असलेल्या श्री तुलसी रामायण कथा सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. कार्तिक जन्माष्टमी उत्सवानिमित्त श्री तुलसी रामायण कथा सप्ताह सुरू करण्यात आला होता. या सप्ताह काळात हभप बाबाजी महाराज काटकर यांनी श्री तुलसी रामायण कथा निरुपण केली. कथा श्रवण करण्यासाठी वडगाव शहरासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे विविध मान्यवरांच्या हस्ते अभिषेक, महापूजा करण्यात आली. शनिवारी रात्री १२ वाजता श्री काळभैरवनाथ पोटोबा महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. तत्पूर्वी हभप तुषार महाराज दळवी यांची देवजन्माची कीर्तनसेवा संपन्न झाली. सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली होती. बुधवारी सकाळी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने या सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.