Rajgurunagar : श्री अरिहंत पतसंस्थेचा विक्रमी नफा १ कोटी १८ लाख
Rajgurunagar : श्री अरिहंत पतसंस्थेत सध्या एक हजार २२८ सभासद असून, संस्थेकडे ५७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

राजगुरुनगर : श्री अरिहंत पतसंस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सभासदांशी जिव्हाळ्याचे नाते जपत संस्थेने गेल्या २५ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. यंदा पतसंस्थेने एक कोटी १८ लाख रुपयांचा विक्रमी नफा मिळवला असून, संस्थेच्या आर्थिक प्रगतीची ही महत्त्वपूर्ण नोंद ठरली आहे.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सिंगवी आणि उपाध्यक्ष पायल ओसवाल यांच्या हस्ते भेटवस्तू वितरण कार्यक्रम पार पडला. दिवाळीनिमित्त सभासदांना भेटवस्तू देण्यामागे केवळ औपचारिकता नसून, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्याची भावना आहे. सर्व संचालकांच्या एकोप्याने आणि सामूहिक निर्णयातून संस्थेचा कारभार सुरू असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुशील सिंगवी यांनी सांगितले.
सभासदांना २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला संचालक सागर बालदोटा, प्रशांत कर्नावट, अनिता गुजराथी, सतीश ओसवाल, अनिल बालदोटा, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अजय बालदोटा, माजी सरपंच प्रदीप कासवा, पंकज बोरा, दिनेश बालदोटा, कांतिलाल उपाध्ये, महिंद्र गुगळे, शिरीष कुलकर्णी, नितेश ओसवाल, व्यवस्थापिका नीलिमा कांबळे आणि संतोष गुजराथी यांच्यासह पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संचालक प्रशांत कर्नावट यांनी आभार मानले.
५७ कोटींच्या ठेवी; ४४ कोटींचे कर्जवाटप
श्री अरिहंत पतसंस्थेत सध्या एक हजार २२८ सभासद असून, संस्थेकडे ५७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सभासदांना ४४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, २३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यंदा संस्थेने एक कोटी १८ लाख रुपयांचा विक्रमी नफा मिळवला आहे. आर्थिक प्रगतीसोबतच संचालक मंडळातील एकोपा आणि सभासदांचा विश्वास यामुळे संस्थेची वाटचाल अधिक बळकट होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





