Shreya Ghoshal : श्रेया घोषालच्या चाहत्यांना धक्का ! भारत पाकिस्तान तणावादरम्यान घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढत चालला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात चिंतेचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम मनोरंजनसृष्टीवर देखील पाहायला मिळत आहे. भारत पाकिस्तान तणावादरम्यान प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
काय घेतला निर्णय?
श्रेया घोषालने देशातील परिस्थिती आणि तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता तिचं आगामी कॉन्सर्ट रद्द केलं आहे. 10 मे 2025 रोजी मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये होणारा‘ऑल हार्ट्स टूर’चा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तिच्या या निर्णयामुळे तिचे चाहते नाराज होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
पोस्टद्वारे दिली माहिती
श्रेया घोषालने ही माहिती स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. “माझ्या प्रिय चाहत्यांनो, जड अंतःकरणाने सांगते आहे की हा कार्यक्रम सध्या आपल्या देशात सुरु असलेल्या परिस्थितीमुळे पुढे ढकलला जात आहे. एक कलाकार म्हणून मला हा शो खूप खास वाटतो, पण एक नागरिक म्हणून, देशासोबत उभं राहणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे.”असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
तसेच श्रेया पुढे म्हणते, “हा शो रद्द केलेला नाही, फक्त पुढे ढकललेला आहे. आपण लवकरच भेटू, आणि अधिक जोमाने मैफिल गाजवू.”तसेच पोस्टचा शेवट करताना चाहत्यांना आवाहन केलं, “तोपर्यंत कृपया सुरक्षित राहा, एकमेकांची काळजी घ्या. आपल्या प्रेमासाठी आणि समजुतीसाठी धन्यवाद.”
तिच्या या निर्णयामुळे अनेक चाहते थोडे नाराज असले तरी, तिच्या देशभक्तीच्या भावना पाहून तिचं कौतुकदेखील केले जात आहे. तसेच श्रेया घोषालने हेही स्पष्ट केलं आहे की, जे प्रेक्षक आधीच तिकीट खरेदी करून ठेवले आहेत, त्यांच्या तिकिटांवर पुढील नवीन तारखेसाठी प्रवेश मिळेल.





