Shreya Ghoshal: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिने अलीकडील मुलाखतीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ‘चिकनी चमेली’सारखी महिलांना वस्तूप्रमाणे दाखवणारी गाणी आता पुढे गाणार नाही, असे तिने स्पष्ट सांगितले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे संगीतविश्वात चर्चांना उधाण आले आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या अग्निपथ या चित्रपटातील ‘चिकनी चमेली’ हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यावर अभिनेत्री कतरिना कैफ हिने नृत्य केले होते. आजही पार्टी, लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे मोठ्या उत्साहात वाजवले जाते. मात्र, या गाण्याबाबत श्रेयाने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Shreya Ghoshal राज शमानी (Raj shamani )यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना श्रेयाने सांगितले की, ‘चिकनी चमेली’नंतर तिला अशाच प्रकारची अनेक गाणी ऑफर झाली होती. काही गाण्यांमध्ये महिलांना केवळ आकर्षणाचे साधन म्हणून दाखवले जात होते. काही गाण्यांचे बोल तिला आक्षेपार्ह वाटले. “त्या शब्दांचा विचार केला की मलाच लाज वाटली. म्हणून मी ती गाणी नाकारली,” असे तिने सांगितले. Shreya Ghoshal ‘चिकनी चमेली’बद्दल बोलताना ती म्हणाली, “ते गाणे फक्त मजेदार नव्हते, त्यात कलात्मकताही होती. चित्रपटात आलेली आवृत्ती आधीच्या मसुद्यापेक्षा सौम्य होती. त्या वेळी मी इतकी मोठी नव्हते की प्रत्येक ओळीचा पूर्ण अर्थ समजून घेऊ शकले असते.” मात्र आता ती गाणी निवडताना अधिक सजग असल्याचे तिने स्पष्ट केले.Shreya Ghoshal श्रेया पुढे म्हणाली की, एखादे गाणे लोकप्रिय झाले की ते तिला सर्वत्र गावे लागते, कधी कधी लहान मुलांसमोरही. त्यामुळे गाण्याचे बोल योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. “मी ते गाणे आजही कॉन्सर्टमध्ये गाते. मला त्याची लाज वाटत नाही. ते माझे गाणे आहे आणि मी ते स्वीकारले आहे. पण आता अशी गाणी रेकॉर्ड करणार नाही,” असे ती ठामपणे म्हणाली. दरम्यान, श्रेयाने अलीकडेच ‘यही गुजार दून’ या नव्या गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्यात तिच्यासोबत अमाल मलिक यानेही गायन केले आहे. याशिवाय तिने ‘द अनस्टॉपेबल वर्ल्ड टूर’ची घोषणा केली आहे. या दौऱ्यात ती यूके, यूएसए, भारत आणि अबू धाबी येथे सादरीकरण करणार आहे. तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी चाहते या कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकूणच, श्रेया घोषालने घेतलेला हा निर्णय महिलांच्या सन्मानाबाबतचा जागरूक संदेश देणारा मानला जात आहे.