सातारा -श्रावण मासात मंगळागौर, नागपंचमी, राखी पौर्णिमा असे अनेक सण महिला वर्गांसाठी मोठी पर्वणी असते; परंतु करोना संकटात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे या पारंपरिक सणांच्या आनंदावर विरजण पडणार, असे वाटत असतानाच “फेसबुक सातारा’ या समूहाने महिलांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा, उखाणे यासारख्या स्पर्धा या समूहाने ऑनलाइन आयोजित केल्याने हे सण आता हायटेक झाले आहेत. श्रावणात नागपंचमी, राखी पौर्णिमा, असे अनेक सण खास महिलांसाठी असतात. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौर पूजतात. त्या दिवसभर उपवास करतात आणि रात्री मंगळागौरीचे खेळ खेळतात; परंतु यंदा या सणांमधील पारंपरिक कार्यक्रम व खेळांवर करोना संक्रमणाचे सावट आहे. त्यामुळे महिलांना एकत्र येऊन हे कार्यक्रम करणे शक्य नसल्याने “फेसबुक सातारा’ या सोशल मीडियावरील समूहाने “ऑनलाइन’ कार्यक्रमांची पर्वणी आणली आहे. मंगळागौर, नागपंचमी या सणांशी निगडीत कार्यक्रमांचे हायटेक आयोजन महिलांसाठी करण्यात आले आहे. करोनामुळे यंदा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रमांना परवानगी नाही. श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात खास महिलांसाठी अनेक सण असतात. हे सण व कार्यक्रम सामूहिकपणे साजरे करणे अशक्य असले तरी त्यांचा आनंद महिलांना “ऑनलाइन’ घेता येईल. “फेसबुक सातारा’ या पेजवर महिलांसाठी छोटेखानी कार्यक्रम व मंगळागौरीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी वैयक्तिक अथवा समूहाने सादर केलेल्या कार्यक्रमांचे व्हिडिओ पाठवायचे आहेत. पाककला स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनने हिरावून घेतलेला महिलांचा आनंद या ऑनलाइन स्पर्धांमुळे द्विगुणीत होणारा आहे. “फेसबुक सातारा’ टीमने “श्रावणमासी उखाणा’ स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषा, अलंकार परिधान करून महिलांनी त्यांचे व्हिडिओ तयार करायचे आणि ते फेसबुक पेजवर पाठवायचे आहेत. सहभागी स्पर्धकांनी उखाण्यांचे व्हिडिओ “श्रावणमासी फेसबुक सातारा’ हा हॅशटॅग वापरून पोस्ट करावा. व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रावण मासातील कार्यक्रम महिला एकत्र येऊन करतात. यंदा करोनामुळे यावर बंधने आल्याने आम्ही “फेसबुक सातारा’च्या माध्यमातून महिलांना संधी उपलब्ध करून दिली आहे. – पूनम पाटील-संकपाळ, फेसबुक सातारा समूह