‘पुणेकर मुस्लिम देशाच्या बाजूने असल्याचे दाखवून द्या’

मा. सहाय्यक पोलीस आयुक्त बर्गे यांचे आवाहन
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मुस्लिम समाजाच्या अनेक मुस्लिम योद्ध्यांनी महाराजांच्या वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. ही आपली परंपरा असून आजच्या करोना महामारीच्या काळात पुणेकर मुस्लिम देशाच्या बाजूने असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले आहे.
यासंदर्भात बर्गे यांनी एक संदेश प्रसिद्ध केला असून त्यात ते म्हणतात की, आजही आपल्या भारत देशासाठी अनेक मुस्लिम आपली सेवा करून आयुष्य अर्पण करत आहेत. समाजातील काही ठराविक लोक संपूर्ण मुस्लिम समाजाचे नाव खराब करत आहेत. आणि त्यातूनच आजची मुस्लिम युवा पिढी चुकीच्या मार्गाने जाते आहे. दहशतवाद विरोधी पथकात एक अधिकारी म्हणून काम करताना “इसिस’सारख्या संघटनेचा धोका आपल्या समाजापर्यंत येऊन ठेपला होता. त्या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यात मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मंडळी, मौलाना, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि मीडियाच्या मदतीने अनेक मुस्लिम तरुणांना योग्य मार्गदर्शन करून प्रयत्नपूर्वक पुन्हा मुख्य प्रवाहात व योग्य मार्गावर आणण्यात यश आले होते. त्यामुळे आता पुन्हा पुण्यातील मुस्लिम समाज हा नेहमीच राष्ट्रासोबत असल्याचे दखवून देण्याची वेळ आली आहे.
तुम्हाला माहीत असेलच की, आता पवित्र मक्का, मदिना आता पूर्ण बंद आहे. मंदिरे, गुरुद्वारा, चर्च सर्वच बंद आहे. विविध जाती-धर्माचे सर्व लोक घरी बसूनच देवाजवळ प्रार्थना करत आहे. घरी बसून देखील मनापासून केलेली प्रार्थना ही देवापर्यंत, अल्लापर्यंत, जीजसपर्यंत पोहोचतेच, असे या संदेशात शेवटी म्हटले आहे.





