Pune | “ईव्हीएम” मध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे दाखवा

पुणे, – विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर विरोधकांकडून “ईव्हीएम’वर फोडले जात आहे. “ईव्हीएम’ घोटाळा झाल्याचे पुरावे दाखवून ते सिद्ध करुन दाखवण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी विरोधकांना दिले आहे.
पवार यांनी डाॅ. बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला केली आणि बाबा आढाव यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. “आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसार बाबा आढाव आंदोलन करत आहेत.
बाबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी निवडणूक आयोग, कोर्ट यांच्याशी संबंधित आहेत,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. बारामतीच्या मतदारांचे उदाहरण द्यायचे झाले, तर त्यावेळी दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्या. बारामतीतल्या मतदारांनी एकाच वेळी लोकसभेसाठी शरद पवारांना मतदान केलं आणि त्यांनी विधानसभेला माझ्यासह इतर उमेदवारांना मतदान केले.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बारामतीमधून शरद पवारांना ८६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मला केवळ ३५ ते ४० हजार मतांचे लीड मिळाले होतं. तेव्हा मी मतदारांवर, लोकशाही प्रणालीवर, निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. आता हे पराभूत उमेदवार सांगतात की ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे. त्यांनी पुरावे दाखवावेत,’ असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ आणि महायुतीने १७ जागा जिंकल्या. त्यावेळी कोणी काही म्हणाले नाही. बारामतीत माझ्या पक्षाच्या उमेदवार पराभूत झाल्या. जनतेचा कौल ५ महिन्यांत बदलला, त्याला आम्ही काय करणार? जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे.
– अजित पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष





