शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत जाहिर करा, अन्यथा…- बच्चु कडू

मुंबई: राज्यात सरकार केव्हाही स्थापन करा, त्याच्याशी आमचं काही देणे-घेणे नाही. पण आस्मानी संकटाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत जाहिर करा. अन्यथा, मोर्चा काढून आम्ही थेट राज्यपालांच्या बंगल्यात घुसणार, असा इशारा अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी दिला.
बच्चु कडू म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्यपालांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. सरकार केव्हाही स्थापन करा, पण दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहिर करा, अनुदान जाहिर करा. सरकार बनेल तेव्हा बनेल, पण शेतकरी वाचला पाहिजे. अन्यथा आम्ही राज्यपालांच्चा बंगल्याबाहेर आंदोलन करून बंगल्यात घुसू, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आमदारांची “मातोश्री’ निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचीही उपस्थिती होती.
या बैठकीला जाण्यापूर्वी बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.





