मुंबई : मुंबईत शनिवारी पार पडलेल्या विजयी मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. हा मेळावा सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्यानंतर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ठाकरे गटावर जोरदार टीका केली. दुसरीकडे, भाजप नेते आशिष शेलार यांनीही मेळाव्यावरून ठाकरे गट आणि मनसेवर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर देताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिंदे गट आणि भाजपवर पलटवार केला. महाजन म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू मराठी भाषेसाठी एकत्र आले. पूर्वी एक पक्ष घराघरात, भावांमध्ये, काका-पुतण्यांमध्ये भांडणं लावायचा; आता ती जागा भाजपने घेतली आहे. पूर्वीचे राक्षस आक्राळ-विक्राळ होते, आताचे सभ्य पॅन्ट-शर्ट घालणारे आहेत.” राज ठाकरे यांनी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्याआधी भाषण केल्याच्या चर्चेला उत्तर देताना महाजन यांनी हा खोचक टोला लगावला. आशिष शेलार यांच्यावरही महाजन यांनी टीका केली. ते म्हणाले, “मेळाव्याचं यश पाहून सरकार अस्वस्थ झालं आहे. त्यामुळे काही मंत्री असंबंध बडबड करताहेत. शेलार यांना सांस्कृतिक म्हणावं की असांस्कृतिक? त्यांच्यावर संस्कारच नाहीत.” या मेळाव्याने मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असून, येणाऱ्या काळात याचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.