“सरकारला शांत झोप मिळावी, म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का?”; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल

Prakash Ambedkar Vs Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. नागपुरात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अजित पवार यांनी ‘सारखंच फुकटात कसं मिळेल?’ शेतकऱ्यांनी कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये. तुम्ही देखील हातपाय हालवा,’ असे विधान केले होते.
ज्यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का?’ असा सवाल अजित पवार यांना केला आहे.
प्रकाश आंबेडकरांची पोस्ट
प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? तुम्ही म्हणालात, ‘सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?’ पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील?”
“महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला भाव न मिळण्यामुळे अडचणीत आहेत. हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात. परंतु, तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाही. निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपाच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, वास्तव असे आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.”
अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला?
अजित पवारजी, तुम्ही म्हणालात, “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार?
कधीपर्यंत हजारो कोटी…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 2, 2025
शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही
“सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये जाहीर करण्यात आली आहे पण, शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत आहेत! म्हणजे जवळजवळ ३० टक्के कमी! कापसाची स्थितीही तितकीच भयानक आहे. अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांना उद्ध्वस्त केलं आहे. ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकं नष्ट झाली आहेत. सरकारने मदत जाहीर केली पण, जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही. Prakash Ambedkar Vs Ajit Pawar |
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत. तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का? शेतकऱ्यांना भिक नको आहे, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत.वंचित बहुजन आघाडी तुमच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध करते.” Prakash Ambedkar Vs Ajit Pawar |
हेही वाचा:
मेक्सिकोमध्ये भीषण आग ; अनेक मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू





