Pune Crime News : पुण्यातील चड्डी बनियन चोर अखेर जेरबंद; अवघ्या दहा महिन्यात ८ लाखांची केली चोरी

पुणे : बड्या अंडरगारमेंट ब्रँडच्या वितरकाकडे सेल्समनचे काम करणाऱ्या एकाने तब्बल आठ लाख रुपयांचे लेडीज आणि जेंन्टस अंडरगारमेंट चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने हा माल अवघ्या दहा महिन्यात एका दुकानातून चोरला होता. विक्रीचा हिशोब लागत नसल्याने दुकान मालकाच्या लक्षात ही बाब आली. यानंतर सीसीटीव्ही तपासले असता ही चोरीची घटना उघडकीस आली.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सापळा रचून पळून जात असलेल्या आरोपीला अटक केली आहे. गणपत मांगीलाल डांगी (वय- ४४ रा. विठ्ठल नगर, सिंहगड रोड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून साडेसात लाखाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कल्याणीनगर येथील एस एल एन्टरप्रायजेस नावाच्या जॉकी कंपनीचे दुकानात आठ लाखाच्या मालाची चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलिस हवालदार सागर जगदाळे यांना खबर मिळाली की, चोरी करणारा गणपत डांगी हा कल्याणीनगर येथे थांबलेला आहे. पोलीस पथक जवळ आल्याचा माग लागताच आरोपी पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले.
त्याच्याकडे चौकशी केली असता, तो जॉकी कंपनीच्या वितरकाकडे सेल्समन म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तो एस एल एंटरप्रायजेस दुकानात ऑर्डर घेण्यासाठी दिवसातून दोनदा यायचा. हे दुकान तीन मजली आहे. वरच्या मजल्यावर स्टॉक ठेवला जातो. येथे काही महिला कामगार काम करतात. आरोपी ऑर्डर घ्यायला आल्यावर काम असल्याच्या बहाण्याने वरच्या मजल्यावर जायचा. तेथील सीसीटीव्ही वळवून भिंतीच्या दिशेने ठेवायचा.
यानंतर सोबत असलेल्या बॅगेत लेडीज व जेन्टस अंडरगामेंट भरुन घेऊन जायचा. तो २०२४ पासून अशा प्रकारे चोरी करत होता. दरम्यान, दुकानात एक लाखाचा माल दाखल झाला होता. तो लगेचच संपला असल्याचे कामगार महिलांनी सांगितले. यामुळे मालक सुरेंद्र कुमार शर्मा (३४, रा. मांजरी) यांनी कामगारांकडे कोणी चोरी केली का? अशी विचारणा केली.
मात्र त्यांनी असे केले नसल्याचे सांगितले, तेव्हा दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता डांगी हा वरच्या मजल्यावर संशयास्पदरित्या वावरताना दिसला. याप्रकरणी शर्मा यांनी १९ एप्रिलला येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याने चोरलेला माल घरात ठेवला होता तर काही माल इतर दुकानांमध्ये विकला होता. हा माल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट यांचा समावेश होता.
ही कामगिरी उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठाकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, श्रेणी उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, अंमलदार प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदिप जायभाय, सुधीर सांगडे यांच्या पथकाने केली.




