नवी दिल्ली : इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन फीचर जारी केले आहे. व्हॉट्सअॅपने शॉर्ट व्हिडीओ मेसेजचे फीचर जारी केले आहे, याचा अर्थ आता तुम्ही कोणत्याही मेसेजला व्हिडिओसह रिप्लाय देऊ शकता. आधी रिप्लायसाठी टेक्स्ट आणि ऑडिओचा पर्याय होता. हा रिअल टाईम व्हिडिओ संदेश असेल जो 60 सेकंदांचा असेल. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की हा छोटा व्हिडिओ रिप्लाय मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल.
व्हॉट्सअॅपचे हे फीचर हळूहळू प्रसिद्ध होत आहे. लवकरच ते जागतिक स्तरावर लाँच केले जाईल. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे या नवीन अपडेटची माहिती दिली आहे. या व्हिडिओ मेसेजचा वापर वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठीही करता येणार असल्याचे व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे.
टेक्स्ट बॉक्सच्या पुढे व्हिडिओ मेसेजचा पर्याय दिसेल. बाय डीफॉल्ट व्हिडिओ मेसेजमधील ऑडिओ म्यूट केला जाईल, परंतु तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते चालू करू शकता. हे फीचर मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करू शकता.
व्हॉट्सअॅपने अलीकडेच आयफोन (iPhone) वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे, जे प्लॅटफॉर्मवरील लुक आणि सुरक्षा वाढवते. व्हॉट्सअॅपने ट्रान्सफर चॅट फीचर तसेच सायलेन्स अननोन कॉलर फीचर आणि अनेक नवीन फीचर अपडेट्स जारी केले आहेत.
सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की व्हॉट्सअॅप आयओएसवर (iOS) अॅप आवृत्ती 23.14.79 जारी करत आहे. नवीन अपडेटमध्ये वापरकर्ता अनुभव आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल समाविष्ट आहेत.