दौंडमध्ये चड्डी बनियान गँग? हल्लेखोरांनी तरुणाला संपवलं, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

यवतः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका घरात मध्यरात्री दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चव्हाण कटुंबावर दरोडेखोरांनी शस्त्रांच्या साह्याने हल्ला चढवला आहे. हा हल्ला इतका भयानक होता की यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात कटुंबातील इतरही सदस्य जखमी झाले आहे. या प्रकरणातील तीन इमसांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चव्हाण कुटूंब राहते. त्यांच्या घरावरती मध्यरात्री दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाला आपला जीव गमावला आहे, यामुळे चव्हाण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चव्हाण कटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणात विविध शक्यतांचा आधार घेत तपास सुरू करीत आहेत.
जमिनीच्या वादातून हल्ला?
मध्यरात्री तीन जणांनी चव्हाण कुटुंबीयांच्या घरामध्ये शिरकाव करत कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. यावेळी हल्ला करणाऱ्या तीन इसम चड्डी बनियान घालून घरात घुसले होते. हे इसम चोरीच्या उद्देशाने आले होते का? याचा तपास पोलीस करीत आहेत. हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांना आहे, पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करीत आहेत. मात्र, हल्लेखोरांनी चड्डी बनियान परिधान करून घरात शिरकाव केलेल्या तालुक्यात चड्डी बनियान गँगची चर्चा केली जात आहे.





