पुणे स्टेशन परिसरात दुकानाला आग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे स्टेशन परिसरातील एका दुकानाला शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दुकानाच्या परिसरातील एका लाॅजमधील प्रवाशांची जवानांनी सुखरूप सुटका केली.
पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात लाॅज आहे. लाॅजच्या इमारतीत अगरवाल जनरल स्टोअर्स आहे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
आगीत दुकानातील साहित्य जळाले. मोठा धूर झाल्याने घबराट उडाली. जवानांनी लाॅजमधील प्रवाशांची सुखरूप सुटका केली. आगीत दुकानातील साहित्य जळाले. मात्र, कोणीही जखमी झाले नाही. प्राथमिक चौकशीत शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.





