जळगावात दुकाने पेटवली; संचारबंदी लागू

जळगाव – राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पाळधी गावात मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. वाहनचालकाने हॉर्न वाजवल्याने आणि वाहनाचा टच झाल्याने हा वाद झाला.
मंत्री गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय जळगावातील पाळधी गावातून कारने प्रवास करत होते. त्यावेळी रस्त्यात काही जण उभे असल्याने वाहनचालकाने हॉर्न वाजवला. त्यावेळी उपस्थित काही जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणा-या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने-सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे हा राडा इतका भयंकर होता की, त्यात १० ते १२ दुकाने पेटवण्यात आली. परिणामी, पाळदी गावात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.





