Beed Crime : बीडमध्ये गोळीबाराचा थरार..! खरेदीसाठी आली अन् बळी ठरली; ३० वर्षीय तरुणीच्या थेट छातीत घुसली गोळी

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेवराई येथे एका ३० वर्षीय तरुणीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा परिसरात खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील शहागड येथील खामगाव परिसरातील शितल कटमिल्ला पवार ही तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्या छातीत गोळी लागल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शितल पवार ही आपल्या मैत्रीणीसह शनिवारी सायंकाळी गेवराईत खरेदीसाठी आली होती. खरेदी करत असताना अचानक तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी दोघींना मारहाण सुरू केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी शितल आणि तिची मैत्रीण वेगवेगळ्या दिशेने पळाल्या. मात्र, हल्लेखोरांनी शितलवर गोळीबार केला. या घटनेत तिच्या छातीत गोळी घुसली असून तिच्या हातापायांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत.
रात्रीच रुग्णालयात दाखल
हल्ल्यानंतर शितलला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गंभीर अवस्थेत बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. एक्स-रे तपासणीत तिच्या छातीत गोळी असल्याचे स्पष्ट झाले. सध्या तिची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शितलसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, हा गोळीबार गेवराईतच झाला. या माहितीच्या आधारे गेवराई पोलीस तपास करत असून, हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बीडमधील गुन्हेगारीने चिंता वाढवली
बीड जिल्हा सध्या सततच्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे चर्चेत आहे. यापूर्वीही जिल्हा कारागृहातील गांजा प्रकरण, हाणामारी आणि धमकीच्या घटनांनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. आता गेवराईतील या गोळीबाराच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गेवराई पोलीस या प्रकरणी हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा आधार घेत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.





