Virar News : धक्कादायक! सुटकेसमध्ये आढळले महिलेचे ‘शीर’; विरारमध्ये खळबळ

विरार : आज सगळीकडे होळीचा सण साजरा केला जात आहे. यादरम्यान विरारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका ओसाड ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचे मुंडके आढळले आहे. स्थानिक मुलांनी जेव्हा ही सुटकेस उघडली तेव्हा ही संपूर्ण घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
घटनास्थळी कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम पोहोचली असून पुढील तपास सुरु आहे. मांडवी पोलिस या हत्येचा तपास करत असून, हा गुन्हा कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.





