बलात्काराचा आरोप ठरला फोल? कोंढव्यातील संगणक अभियंता तरुणीच्या प्रकरणात धक्कादायक वळण, आरोपी ओळखीचा, सेल्फी एडिटचेही उघड

पुणे : कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. पोलिसांनी अटक केलेला आरोपी पिडीत तरुणीचाच ओळखीचा निघाला असून, हे नातं तिने पोलिसांपासून लपवले होते. तांत्रिक तपासात ही माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत असून तो गेल्या वर्षभरापासून पीडितेसोबत संपर्कात होता. त्यांच्या ओळखीची सुरुवात समाज मेळाव्यात झाली होती आणि ते नियमितपणे फोन व सोशल मीडियावर संवाद साधत होते. आरोपी पीडितेच्या घरीही अनेकदा येत होता.
तपासात हेही स्पष्ट झाले आहे की, आरोपीने फूड डिलिव्हरी ॲपमार्फत तिला अनेक वेळा जेवण पाठवले होते. घटनेच्या दिवशी तो सोसायटीतील सीसीटीव्हीत सव्वा सात वाजता आत आणि पावणे नऊ वाजता बाहेर जाताना दिसत आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्का देणारी बाब म्हणजे पीडितेने पोलिसांना दिलेला मोबाईलमधील सेल्फीही एडिट केलेला आढळून आला आहे. त्या फोटोखाली लिहिलेला संदेशही तिनेच तयार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या सर्व घडामोडींमुळे या प्रकरणात बलात्कार झाला की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. पीडितेचा जबाब नोंदवला जात आहे. सध्या कोणत्याही निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचलेले नाहीत. आरोपी आमच्या ताब्यात असून, पीडितेचे समुपदेशन मानसोपचार तज्ज्ञांकडून सुरू आहे.”
त्याला ठेवायचे होते ताब्यात ?
दरम्यान, एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की ताब्यात घेतलेला तरुण करोडपती आहे. त्याच्याकडे लक्झुरियस सदनिका, उंची गाडी आणि लाखोचे पॅकेज आहे. त्याच्याशी विवाह केला, तर आयुष्याचे भले होईल. यामुळे त्याला आपल्या ताब्यात ठेवणे आवश्यक आहे. यासाठी त्याच्याविरुद्ध तक्रार करायची.
मात्र, पोलिसांनाही त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, असा रीतसर प्लॅन पीडितेने मागील आठवडाभरात केला होता. त्यासाठी लिफ्टमधील सीसीटीव्हीत तो कोणत्या मजल्यावर गेला हे सापडू नये म्हणून त्याला जाताना पायऱ्यांनी जाण्यास सांगितले. यामुळे तो तब्बल ११ मजले चालत खाली उतरल्याची बाब प्राथमिक तपासात दिसत आहे.





