धक्कादायक…! मांत्रिकानेच विष दिल्याने ‘त्या’ नऊ जणांचा मृत्यू ; सांगलीतील वनमारे कुटुंबाची आत्महत्या नव्हे हत्याच

सांगली : 20 जून रोजी सांगली येथे 9 जणांनी केलेल्या आत्महत्येमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला होता. त्याच आत्महत्या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा खुलासा तपास करणाऱ्या पोलिसांनी केला आहे. त्या 9 जणांची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं असून एका मांत्रिकाने या कुटुंबाला चहातून विष दिले आणि त्यातूनच या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
वनमारे कुटुंबाला ज्या मांत्रिकाने विष दिले त्याचे नाव अब्बास मोहम्मद अली बागवान असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय मांत्रिकाने धीरज चंद्राक सुरवसे या ड्रायवरच्या मदतीने या कुटुंबाला मारले. या दोघांनीच हे भयानक हत्याकांड रचल्याचंही समोर आले आहे. बागवान हाच मुख्य आरोपी असून त्याच्या ड्रायव्हरचा देखील या हत्याकांडात हात आहे.
या मांत्रिकाने कशा प्रकारे या हत्येचे नियोजन केले याची माहिती देखील समोर आली आहे. हा मांत्रिक वनमारे कुटुंबियांच्या घरात रहस्यमयी खजिन्याच्या शोधात आला होता. यावेळी घरातील सर्व सदस्यांना त्याने घराच्या गच्चीवर पाठवलं. त्यानंतर एक एक व्यक्तीला खाली बोलावलं मग त्यांना चहा प्यायला सांगितलं, चहा पिल्यानंतर एक एक जण बेशुद्ध पडला आणि तेव्हाच वनमारे कुटुंबाचा शेवट झाला होता. दरम्यान पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यंची कसून चौकशी केली जातेय.
आत्महत्या नव्हे हत्याच
20 जून रोजी वनमारे बंधूंच्या आत्महत्येनं संपूर्ण म्हैसाळ गाव हादरुन गेलं होतं. 9 जणांचे मृतदेह घरात निपचित पडल्याचं समोर आल्यानंतर गावकरी हादरुन गेले होते. डॉक्टर आणि शिक्षक बंधूंची आत्महत्या झाली असल्याचं समजताच संपूर्ण सांगली हादरलेली. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे.





