धक्कादायक! पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर बेपत्ता वडिलांचाही मृतदेह सापडला; प्रकरणातील रहस्य वाढले

पुणे: पुण्यातील धानोरी परिसरात राहणाऱ्या महिलेसह तिच्या सहा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर आता या महिलेच्या पतीचा मृतदेह आढळून आला आहे. खानापूर पोलिसांना पती आबिद शेख यांचा मृतदेह सापडला आहे. सासवड आणि कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ बुधवारी माय लेकांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस आबिद शेखच्या मागावर असतानाच त्यांचाही मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ आणखीन वाढले आहे.
पत्नी आलिया आणि मुलगा आयान यांचा खून केल्यानंतर बेपत्ता झालेल्या आबिद अब्दुल शेख याचा आज सकाळी खानापूर येथे नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला आहे. खडकवासला धरणाच्या पुढे खानापूर येथे एक मृतदेह आढळून आला. तपास करता गेले काही दिवस पुणे व ग्रामीण पोलीस ज्यांचा शोध घेत होते. त्या आबिद शेख यांचा तो मृतदेह असल्याचे लक्षात आले. हवेली पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
पिकनिकसाठी गेलेल्या शेख या कुटुंबाची हत्या झाल्याने पुण्यात बुधवारी खळबळ माजली. सासवड-जेजुरी रस्त्यावरील एका गावात सकाळी सात वाजता महिलेचा मृतदेह आढळला. तर तेथून ३५ किमी दूर कात्रजजजळ पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. दरम्यान पती आबिद शेख बेपत्ता असल्याने प्रकरणाचे गूढ वाढले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया अबीद शेख आणि आयान शेख यांची हत्या करण्यात आली आहे, तर एका विमा कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून काम करणारा पती आबिद सुद्धा बेपत्ता होता. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून पुण्यात लोहगावमधील ब्रुकलिन-प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये वास्तव्यास होते. मायलेकांचा मृतदेह सापडल्यानंतर आज आदिबचाही मृतदेह सापडल्याने नक्की या तिघांसोबत काय घडले यासंदर्भातील रहस्य वाढले आहे.





