धक्कादायक ! रॅगिंगमुळे आत्महत्या; 4 विद्यार्थिनींना 5 वर्षांचा तुरूंगवास

भोपाळ – मध्यप्रदेशात ऑगस्ट 2013 मध्ये एका विद्यार्थिनीने रॅगिंगच्या यातना सहन न झाल्याने जीवनयात्रा संपवली. त्या रॅगिंगशी संबंधित आत्महत्या प्रकरणी येथील न्यायालयाने तेव्हा विद्यार्थिनी असणाऱ्या चौघींना पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. अशाप्रकारचा तो मध्यप्रदेशातील बहुधा पहिलाच निकाल मानला जात आहे.
खासगी फार्मसी महाविद्यालयात शिकणाऱ्या अनिता शर्मा या विद्यार्थिनीने सुमारे आठ वर्षांपूर्वी भोपाळमधील घरी गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी तिने एक चिठ्ठीही लिहिली. त्यामध्ये तिने देवांशी शर्मा, किर्ती गौड, दिप्ती सोलंकी आणि निधी मग्रे यांच्याकडून झालेल्या रॅगिंगचा उल्लेख केला. त्यामुळे त्या चौघींवर अनिताचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
भोपाळमधील सत्र न्यायालयाने चौघींनाही दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. त्यांना प्रत्येकी 8 हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दरम्यान, मोठी स्वप्नं बाळगत हुशार आणि सक्षम विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांत जातात. मात्र, रॅगिंगमुळे होणाऱ्या यातनांतून ते जीवन संपवतात. तशा घटनांत संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबरच त्यांच्या पालकांचीही स्वप्नं उद्धवस्त होतात, असे निरीक्षण न्यायालयाने निकाल देताना नोंदवले.





