हरियाणा IPS आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे: ASI च्या सुसाईड नोटमधून 50 कोटींच्या डीलचा आरोप

रोहतक : हरियाणा पोलिस दलातील आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रोहतक पोलिसांच्या सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक (ASI) संदीप लाठर यांनी आत्महत्या केली असून, त्यांनी तीन पानांचे सुसाईड नोट लिहून आयपीएस पूरन कुमार यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या नोटमधून 50 कोटींच्या डीलसह अनेक धक्कादायक दावे समोर आले आहेत.
50 कोटींची डील आणि भ्रष्टाचाराचे आरोप –
संदीप लाठर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये दावा केला आहे की, आयपीएस पूरन कुमार यांनी सदर पोलिस स्टेशनमधील एका खुनाच्या खटल्यात काँग्रेस नेते राव इंद्रजित यांना वाचवण्यासाठी 50 कोटींची डील केली होती. संदीप यांनी लिहिले आहे की, पूरन कुमार हे भ्रष्टाचारी अधिकारी होते आणि आपल्या जातीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देत होते.
तसेच, ते आपल्या राजकीय प्रभावाचा आणि कुटुंबाच्या प्रशासकीय बळाचा दावा करत होते. संदीप यांनी नोटमध्ये उल्लेख केला की, पूरन यांनी सांगितले होते की, “माझे काही बिघडणार नाही, माझी पत्नी आयएएस आहे, साला आमदार आहे आणि कुटुंब अनुसूचित जाती आयोगात आहे.” या ताकदीच्या जोरावर ते भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप संदीप यांनी केला आहे.
आयपीएस पूरन कुमार यांनी 7 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती आणि आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी जातीय अत्याचाराला कारणीभूत ठरवले होते. त्यांनी हरियाणाचे डीजीपी आणि मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. मात्र, संदीप लाठर यांनी आपल्या नोटमध्ये पूरन यांच्यावरच जातीयवाद पसरवण्याचा आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे.
संदीप यांनी लिहिले आहे की, रोहतक रेंजमध्ये बदली झाल्यानंतर पूरन यांनी आपल्या जातीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आयजी कार्यालयात नियुक्त केले आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना दुर्लक्षित केले. तसेच, फायलींच्या नावाखाली पैसे उकळले जायचे आणि बिनकामाचे बोलावून त्रास दिला जायचा, असेही संदीप यांनी नमूद केले आहे.
डीजीपींचे कौतुक, बिजारनियांचा पाठिंबा –
संदीप यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये हरियाणाचे डीजीपी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, राज्यात अनेक भ्रष्ट अधिकारी असले तरी काही प्रामाणिक अधिकारी भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहेत. डीजीपी एक प्रामाणिक व्यक्ती असल्याचे त्यांनी लिहिले आहे. तसेच, संदीप यांनी आपल्या शेवटच्या व्हिडिओत रोहतकचे माजी एसपी नरेंद्र बिजारनिया यांचे समर्थन केले आहे. बिजारनिया यांचे या प्रकरणानंतर बदली झाली होती, पण संदीप यांनी त्यांना प्रामाणिक अधिकारी म्हणून संबोधले आहे.
तपासाला नवे वळण –
आयपीएस पूरन कुमार यांच्या आत्महत्येनंतर आता ASI संदीप लाठर यांच्या आत्महत्येने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संदीप यांनी केलेल्या आरोपांमुळे पोलिस दलातील भ्रष्टाचार आणि जातीयवादाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तपास यंत्रणा आता या सुसाईड नोटमधील दाव्यांची चौकशी करत आहे. या प्रकरणातील पुढील तपास काय दिशा घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





