धक्कादायक! प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या टांझानियन इन्स्टास्टार किली पॉलवर चाकूने हल्ला

नवी दिल्ली – जगभरात प्रसिद्ध असलेल्या टांझानियन इन्स्टा स्टार किली पॉलवर अज्ञात लोकांनी चाकूने हल्ला केला आहे. याशिवाय लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला, पण तो कसा तरी स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी झाला.
किलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या घटनेची माहिती दिली आहे. तसेच स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तो जखमी दिसत आहे.
किली पॉलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘माझ्यावर 5 जणांनी हल्ला केला, माझ्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली. मला 5 टाके पडले. याशिवाय मला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तरी देखील मी दोन जणांशी झुंज देऊन मी स्वतःचा बचाव करू शकलो आणि तेथून पळ काढला. माझ्यासाठी प्रार्थना करा, असंही किलीने म्हटलं. किली पॉलने 29 एप्रिल रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या घटनेबद्दल सांगितले होते.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात टांझानियाच्या सोशल मीडिया प्रभावशाली भाऊ आणि बहिणीचे कौतुक केले होते. काइली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल यांच्या लिप सिंकिंग कलेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली होती. या दोघांनाही भारतीय संगीताची आवड, क्रेझ आहे आणि म्हणूनच ते खूप लोकप्रिय आहेत, असे पंतप्रधान म्हणाले होते. पंतप्रधानांच्या या स्तुतीनंतर दोघांची लोकप्रियता झपाट्याने वाढली होती.





