Pune Crime News : पुण्यात धक्कादायक प्रकार: सराईत गुंडाने सहकारनगर पोलीस ठाण्यात घातला राडा, घटनेने खळबळ

Pune Crime News : सहकारनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्री सराईत गुन्हेगार बारक्या लोंढे याने चांगलाच हैदोस घातला. पोलिसांच्या तोंडावर मिर्ची स्प्रे मारत त्याने पोलिस ठाण्यात तोडफोड केली, काचा फोडल्या आणि स्वतःला जखमी करून घेतले. या घटनेत चार ते पाच पोलिसांना श्वसनाचा त्रास जाणवला असून, रात्रभर ठाण्यात गोंधळाचे वातावरण होते.
गुन्हेगाराने पोलिस ठाण्यात घरात घुसून मर्डर करण्याची धमकी दिली. या साऱ्या घटनेनंतर देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक ठाण्यात उपस्थित नव्हते, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. घटनास्थळी केवळ रात्रगस्तीचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे दाखल झाले, मात्र त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसून आले नाही.
रक्तबंबाळ अवस्थेतील गुन्हेगाराला पहाटे चार वाजता तपास पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला काबूत आणताना आणि सांभाळताना पोलिसांना अक्षरशः नाकीनऊ आले.
वरिष्ठांकडून मदतीचा अभाव आणि पोलिस ठाण्यातील अपुऱ्या सुविधा यामुळे या घटनेने पुणे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.





