धक्कादायक! विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पारगाव – दौंड तालुक्यातील नानगाव येथे राजाराम बापूराव खळदकर वय (५३) व त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर वय (४६) हे विद्युत मोटारीच्या केबलला विजेचा शाॅक लागल्याने त्यास चिकटून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.खळदकर यांची जमीन नदीच्या किनारी असल्याने विद्युत पंप ही त्या ठिकाणी असतात. विद्युत पंप ते पॅनल बॉक्सपर्यंतच्या केबल या तेथील गवतामधून गेल्या आहेत.
दि.२२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सायंकाळी पाचच्या सुमारास नुकताच पाऊस पडून गेला असताना नदीच्या किनारी खळदकर यांची शेळी तेथील गवतातील केबलला चिटकली तिला वाचविण्यासाठी मनीषा खळदकर या गेल्या व त्याही चिकटल्या. मनीषा यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती राजाराम खळदकर हे गेले असता शेळीसह या खळदकर पती पत्नीचा विजेचा करंट बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मनीषा व राजाराम खळदकर यांना एक मुलगा, एक मुलगी असून ते शालेय शिक्षण घेत आहेत.
जून्या केबलमुळे अपघात…
भिमा नदीच्या किनारी वारंवार केबल चोरीमुळे अनेक शेतकरी हैराण झाले असून नवीन केबलचा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी एक किंवा दोन जोड देऊन विद्युत पंप चालू आहेत. हे जोड सुद्धा त्यांच्या व इतरांसाठी जीव घेणे ठरू शकतात.




