नागपूर – नागपूरच्या कोराडी रोड येथे एका डॉक्टरने आपल्याच सहकारी महिला डॉक्टरवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टरला अटक केली आहे आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर नंदू रहंगाडाले असे त्या अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
नागपुरात असलेल्या या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक महिला डॉक्टर सेवेत रुजू झाली. सुरुवातीपासूनच आरोपी डॉक्टरची घाणेरडी नजर या महिला डॉक्टरवर होती. ही महिला डॉक्टर सोमवारी रात्री तिच्या केबिनमध्ये असताना आरोपी डॉक्टर तिच्या केबिनमध्ये आला आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागला.
त्या महिला डॉक्टरने त्याला नकार दिला. त्यानंतर, डॉक्टर अश्लील कृत्य करू लागला आणि त्या महिला डॉक्टरवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. महिला डॉक्टरने त्याला जोरात ढकलले आणि केबिनच्या बाहेर पळाली.
स्वत:चा बचाव केल्यानंतर संबंधित महिला डॉक्टरने मानकापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधारे यांच्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली.