धक्कादायक ! फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील 5 जणांना विषबाधा

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाली आहे. लाखांदूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. या लोकांनी फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खाल्ल्याने ही विषबाधा झाली आहे.
काय घडले नेमके?
ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुद्रुक या ठिकाणी घडली आहे. लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु येथील ताराबाई कुंभरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी उडदाच्या डाळीच्या वड्यांची भाजी बनविली होती.कार्यक्रमानंतर घरातील सर्वांनी जेवण करून उरलेली भाजी घरातील फ्रिजमध्ये ठेवली होती. सकाळी फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी गरम करून खाल्ल्याने पाच जणांची प्रकृती बिघडली.
यानंतर त्यांना तातडीने सरांडी बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी देखील ही भाजी खाल्ली पण त्यांना कोणतीही विषबाधा झाली नाही. यामुळे उरलेली भाजी फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काही चुकीचा प्रकार घडला का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ताराबाई कुंभरे (65), शालिनी कुंभरे (40), गोवर्धन कुंभरे (51), सुजिता कुंभरे (14), दुर्गा कुंभरे (11) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.





