मुंबईकरांची सकाळ आल्हादायक: मान्सूनपूर्व सरींची जोरदार हजेरी

मुंबई : गेल्या दोन अडीच महिन्यांपासून उकाडयामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी शनिवारची सकाळ आल्हादायक झाली. कारण मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पवई, घाटकोपर, वांद्रे, चेंबूर, लालबाग, सायन, दादर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी या सर्व भागात पावसाने हजेरी लावली होती.
तब्बल अर्धा पाऊण तास कोसळलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. महाष्ट्राला तडाखा देणारे निसर्ग चक्रीवादळ आता शांत झाले आहे. पण या वादळामुळे मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. उकाडयामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळाला. निसर्ग चक्रीवादळ बुधवारी अलिबाग, मुरुड या भागामध्ये धडकले.
निसर्ग वादळ धडकण्याच्या एकदिवस आधीपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. मागच्या दोन-तीन दिवसात मुंबईत बऱ्यापैकी पाऊस कोसळला आहे. त्यामुळे तापमानात घट झाली आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती मान्सूनची.





