धक्कादायक! मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबारात १० जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क : मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी बंदूकधारी व्यक्तीने सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मे महिन्यातही अशीच घटना घडली होती. मेक्सिकोच्या मध्य शहरातील हॉटेल आणि दोन बारमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात १० लोकांनी जीव गमावला होता. स्टेट अॅटर्नी जनरल ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल मेक्सिकोमध्ये मार्च महिन्यात १९ लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
अनेकजण जखमी होते, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जानेवारी महिन्यात एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली होती. चार महिन्यातील ही पाचवी घटना होती.
डिसेंबर २००६ मध्ये सरकारने वादग्रस्त लष्करी अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन सुरू केल्यापासून मेक्सिकोमध्ये तीन लाखांहून हून अधिक हत्या झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.





