Shivsena UBT Morcha on BMC : अखेर ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, मात्र मार्गात बदल…

मुंबई :- मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई विरोधात, शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 1 जूूलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला अखेर मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र मोर्चाच्या मार्गावरुन गोंधळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांशी चर्चा करून त्याच्या मार्गात मात्र बदल करण्यात आला आहे.
पालिकेच्या समोरून हा मोर्चा जाणार आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलीस आणि ठाकरे गटात आज बैठक झाली आहे. त्यामध्ये हा तोडगा काढण्यात आला आहे. सुरूवातीला ठाकरे गटाचा मोर्चा मेट्रो सिनेमा ते महापालिकेच्या बाजूला टाइम्स ऑफ इंडियाची इमारती समोरून जाणार होता. परंतू कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या मार्गावरील मोर्चाला परवानगी नाकारली होती.
अखेर मंगळवारी उशिरा ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मोर्चाचा मार्ग आता मेट्रो सिनेमा ते महापालिकेच्या बाजूला असलेल्या आझाद मैदानापर्यंत असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरू आहे. या प्रकरणात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण हे अडचणीत आले आहेत. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीयदेखील अडचणीत आले आहेत.
शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत “मुंबईला कुणी मायबाप राहिलेले नाही. सध्या लुटारूंच राज्य सुरू आहे,’ अशी टीका करत मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती.




