शिंदे गटाच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची भररस्त्यात व्यक्तीला मारहाण; व्हिडिओ आला समोर

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे.राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यावर एका कार चालकाला लोखंडी पाइपाने मारहाण केली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही…
कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!ही फक्त… pic.twitter.com/n0QX7Pp92x
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2024
उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड एका व्यक्तीला भर रस्त्यावर मारहाण करत आहे. एका होंडा सिटी कारमध्ये ही व्यक्ती बसलेली आहे. त्याची बायका मुलं सुद्धा कारमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.
महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा हा बॉडीगार्ड एक लोखंडी पाइप घेऊन या व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. एकापाठोपाठ दोन वेळा त्याने पाइपाने या व्यक्तीला मारहाण केली आहे. हा व्हिडिओ नेरळ परिसरातील असल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिवा नावाच्या बॉडीगार्डने ही मारहाण केली आहे. त्याने कोणत्या कारणामुळे ही मारहाण केली हे अद्याप समोर आलेले नाही.





